अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीलाही होणार अटक? ; वाचा संपूर्ण बातमी.
आर रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी काल अटक केली. बुधवारी पनवेल पोलीस त्यांच्या मुंबईमधील वरळीस्थित घरी पोहचले होते. यावेळी अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने दीड तास पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच एक तास मुंबई पोलिसांना त्यांच्या घराबाहेर उभे करून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. आता त्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीलाही अटक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते, असे वृत्त टीव्ही ९ या मराठी खाजगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. अर्णब गोस्वामी याला अटक करण्यासाठी मुंबई व रायगड पोलीस त्याच्या घरी गेले असता अर्णब गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाहीला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती.
अर्णब यांच्या पत्नीने सरकारी कामकाजाला केलेल्या विरोधामुळे त्यांच्या विरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीला अटक होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.