Skip to content Skip to footer

मुंबई मनपात नोकरी लावतो म्हणून माजी मनपा कर्मचाऱ्यांनी केली अनेकांची फसवणूक

मुंबईत महानगर पालिकेत नोकरीला लावतो म्हणून अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई मनपाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. फसवणूक झालेल्या काही तरुणांनी केलेल्या तक्रारीवरून सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकार उघडीस आला होता.
प्रकाश सदाफुले आणि नितीन धोत्रे या दोघा माजी कर्मचाऱ्यांनी अँटॉप हील येथे शिवणकाम करणाऱ्या गरीब महिलेच्या मुलाला पाणी खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. मनपात नोकरी लागणार म्हणून त्या महिलेने सुद्धा कसे-बसे करून एकूण चार लाख रुपये टप्याटप्याने त्या दोघांना दिले होते.

पैसे देऊन बरेच दिवस झाले, तरी नोकरीबाबत पुढे काहीच होत नसल्याने या महिलेने दोघांशी संपर्क साधला. त्यावेळी या दोघांनी त्यांना नवे कारण सांगितले. महापालिकेत नोकरीसाठी वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे सांगून दोघांनी या महिलेच्या मुलास रुग्णालयात बोलाविले. यानंतर दोघांनी नियुक्तीपत्र दाखवून पालिका मुख्यालयातून कामावर हजर राहण्याबाबत नंतर कळविण्यात येईल, असे सांगितले.

मात्र बराच कालावधी उलटल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने महिलेने दोघांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे मोबाइल बंद होते. महिला आणि तिच्या मुलाने या दोघांचे घर शोधून काढले. त्यावेळी या दोघांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याचे त्यांना कळले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. सध्या पोलीस तपास करत आहे.

Leave a comment

0.0/5