Skip to content Skip to footer

कोस्टल रोड प्रकरणी न्यायालयाचा मुंबई मनपाला दिलासा

सार्वजनिक हिताच्या पायाभूत प्रकल्पाचे काम रोखले जाऊ शकत नाही असे मत नोंदवत मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने कोस्टर रोड मार्गाच्या आड येणाऱ्या पंचम पाणपोईच्या चालकांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सोमवारी नकार दिला. मरिन ड्राइव्हवरील ही पाणपोई हटवण्याची परवानगी एल अँड टी कंपनीने मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे मागितली असल्याने कंपनीला तूर्तास कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखावे, ही पाणपोई चालक स्वयंसेवी संस्थेची विनंती दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली.

नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ‘पंचम, अ चाइल्ड एड असोसिएशन’ या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष राणी पोद्दार यांनी २७ वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या परवानगीने मरिन ड्राइव्ह येथे तारापोरवाला मत्स्यालयासमोरील नेताजी सुभाष मार्गाच्या फूटपाथवर थंड पेयजलाची सार्वजनिक सुविधा असलेली ‘पंचम प्याऊ’ हे पाणपोई केंद्र बांधले.

मात्र हीच पाणपोई सागरी किनारी मार्गाचा एक भाग म्हणून उभारण्यात येणारे रॅम्प, सरफेस रोड, कट अँड कव्हर इत्यादीच्या कामात अडथळा ठरली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम राबवत असलेल्या एल अँड टी कंपनीने १८ सप्टेंबरला मुंबई महापालिकेला पत्र लिहून ती हटवू देण्याची परवानगी मागितली आहे. त्याची माहिती मिळताच राणी पोद्दार यांनी अॅड. आदित्य प्रताप यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यातच तातडीचा अर्ज करून कंपनीला पाणपोई हटविण्याविषयी कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखावे, अशी विनंतीही पोद्दार यांनी केली होती.

Leave a comment

0.0/5