Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांकडून पंचगंगेतील प्रदूषणाची गंभीर दखल, जबाबदार कंपन्यांवर होणार कडक कारवाई

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी प्रदूषणामुळे काळवंडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार धेर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा सुद्धा केली होती.

यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार धैर्यशील माने यांनी उचललेल्या पाऊलानंतर गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगेच्या प्रदुषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांना थेट टाळे लावण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी इत्यादी ठिकाणावरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पुर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे,” अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Leave a comment

0.0/5