Skip to content Skip to footer

एमआयएम आता पश्चिम बंगालमध्ये आम्हाला मदत करेल, भाजपा खासदाराचा दावा

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन पक्ष भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच खुद्द भाजप खासदाराने यावर भाष्य करत या आरोपाला पुष्टी दिली आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशनंतर आता ते आम्हाला पश्चिम बंगालमध्ये मदत करतील, असे उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपाचे खासदाराचं एमआयएम भाजपची ‘बी’ टीम असल्याचे जाहीर सभेत बोलून दाखवत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही एमआयएमवर असेच आरोप झाले होते.

खासदार ओवेसी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एमआयएमला भाजपची बी टीम संबोधत ते भाजपला मदत करण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०२१ च्या निवडणुका लढवतील, असे म्हटले होते. त्यावर ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

आता उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनीच केलेल्या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला पुष्टी मिळू लागली आहे. ‘ही ईश्वराची कृपा आहे, भगवान त्यांना शक्ती देओ. त्यांनी आधी बिहारमध्ये भाजपला मदत केली होती आता उत्तर प्रदेशात आलेले आहेत आणि पश्चिम बंगालमध्येही ते आमची मदत करतील,’ असे साक्षी महाराज म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5