Skip to content Skip to footer

भाजपा नेते आपले संस्कार दाखवून देत आहेत, भातखळकर यांच्या ट्विटवर रोहित पवार भडकले

सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटमध्ये साम्य असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. देशमुख यांनी हे जाहीर केल्यानंतर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत देशमुख यांची करोनावरून थट्टा केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार चांगलेच भडकले आहेत.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केले होते. सेलिब्रिटींनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचा सूर सोशल माध्यमांवर उमटला. काही जणांच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत काँग्रेसने ट्विट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली होती.

देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी करोनाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. भातखळकर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत रोहित पवारांनी भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“विद्वान व्यक्ती नम्र असते अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं खळखळ करते! भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना करोना झाला, तेव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपाचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत, पण करोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5