Skip to content Skip to footer

कोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का? येथे ‘जाणून घ्या’ आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्र बुलेटिन : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात लसीचा पहिला डोस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जात आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील लस दिली जात आहे. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. ७० वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सकाळी सात वाजता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला.

दरम्यान लोकांच्या मनात अजूनही या लसीबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणूनच या प्रश्नांना दूर करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने लोकांना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरे लोकांना जाणून घ्यायची होती.

यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लस घेतल्यानंतर दारू पिणे योग्य आहे का? यावर आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की तज्ञांच्या म्हणण्यानुसार असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की ज्याने असे म्हणता येईल की लस घेतल्यानंतर तुम्ही मद्यपान केले तर त्याचा परिणाम होईल. म्हणजेच, दारू प्यायल्यास रुग्णाला त्रास झाल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की कोविड -१९ लस घेतल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. हे खरे आहे का? आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की या सर्व अफवा आहेत. या लसीचा प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. सर्व लसींची प्रथम चाचणी प्राण्यांवर व मानवांवर केली जाते. जर याचे दुष्परिणाम दिसून आले तर लसीला मान्यताच दिली जात नाही.

लस घेतल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी? या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाने असे आश्वासन दिले आहे की दोन्ही लसी या सुरक्षित आहेत, परंतु कोणतीही गैरसोय किंवा तक्रार असल्यास लस घेणारे जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रात जाऊ शकतात. याशिवाय ते आरोग्य कर्मचार्‍यांना फोन करून सल्ला घेऊ शकतात. लसीकरणानंतर प्रत्येक व्यक्तीला एसएमएसद्वारे फोन नंबर देण्यात येतो.

Leave a comment

0.0/5