Skip to content Skip to footer

वीज ग्राहकांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात होणार २ टक्के ‘कपात’

महाराष्ट्र बुलेटिन : गेल्या वर्षापासून सतावणाऱ्या कोरोनाच्या संकटाने, वाढत्या गॅस आणि इंधन दराने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिला असल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चर्चेचा विषय होता. या दरम्यानच आता वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वीज दरामध्ये २ टक्के कपात करण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान ही वीज दराची कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वीज कंपन्यांना वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन कर (एफएसी) फंडाचा वापर करून ग्राहकांना लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. आयोगानं दिलेल्या आदेशानुसार महावितरण, टाटा, अदाणी, बेस्ट या वीज कंपन्यांच्या वीज दरात सरासरी २ टक्क्यांची कपात केली जाणार आहे.

दरम्यान आयोगानं पुढील पाच वर्षांचे वीज दरही जाहीर केले आहेत. यानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलामध्ये १ टक्क्याची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता युनिटमागे ७.५८ रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच टाटाच्या वीजदरामध्ये एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ केल्याने टाटाच्या ग्राहकांना ५.२२ रुपयांची झळ बसणार असून अदाणी कंपनीच्या वीज ग्राहकांना ०.३ टक्के दरवाढ लागू केल्याने ग्राहकांना प्रत्येक युनिटसाठी ६.५३ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. तर बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्क्याच्या वाढीनुसार युनिटमागे ६.४२ रुपये भरावे लागणार आहेत.

Leave a comment

0.0/5