महाराष्ट्र बुलेटिन : नागपूर मधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे गोर-गरिबांसाठी मोठा आधार आहे. येथे किडनी, हृदय, पोटासंबंधित विविध आजारांवर आणि मेंदूच्या विकारांवर उपचार केले जातात. अशा या गरिबांसाठी वरदान ठरलेल्या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी २०१७ मध्ये फडणवीस सरकारने १०० कोटींची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षात एक रुपयाही त्यांनी दिला नाही आणि ‘सुपर’ ला वाऱ्यावर सोडले. मात्र महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने फडणवीसांची ती घोषणा पूर्ण केली आणि १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता रुग्णालयाच्या तिजोरीत जमा केला.
मेडिकल, सुपर आणि मेयोच्या विकासासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने घोषणांचा पाऊस पाडला होता, मात्र या सर्व घोषणा हवेत विरून गेल्या. २०१७ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन भाजपा सरकारने ४० कोटी देणे अपेक्षित होते, परंतु फडणवीस सरकारने एक कवडी देखील दिली नाही. या निधीच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३५ खाटांचे अतिदक्षता विभाग तयार होणार होते.
दरम्यान भाजपा सरकारच्या काळात रखडलेल्या या कामाची दखल घेत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेऊन ठाकरे सरकारने १०० कोटीमधील पहिला १५ कोटींचा निधी ‘सुपर’च्या तिजोरीत जमा केला आहे. या निधीतून रुग्ण हित लक्षात घेऊन विविध यंत्रांसह आवश्यक बाबींवर खर्च करण्यात येईल. जेणेकरून गरीब रुग्णांना याचा लाभ मिळेल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले.