Skip to content Skip to footer

मुसळधार पावसामुळे राज्यात पुढील पाच दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी…

महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये शनिवारपासून पावसाचा कहर सुरूच आहे, त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान रविवारी पावसाने थोडी उघडीप दिल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली होती, मात्र रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला. तसेच सोमवार सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुन्हा रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानचे रेल्वे रूळ मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा सध्या धीमी गतीने सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून मिळाली आहे.

दरम्यान संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या ३-४ तासाच्या दरम्यान तीव्र ते अति तीव्र पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने १९ ते २३ जुलै दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे, दरम्यान आज सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं असून पावसाची संततधार कायम असल्यानं अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. याचा फटका लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही बसला आहे. मुसळधार पावसामुळे आज काही वेळासाठी लोकल सेवा थांबवण्यात आली होती, त्यांनतर धीम्या गतीने लोकल गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच पावसाचा वाढता जोर लक्षात घेता लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे मुंबईसह चार ते पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

Leave a comment

0.0/5