Skip to content Skip to footer

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या तत्परतेने बाळ व आई सुखरुप, रात्री २ वाजता रुग्णालयात नेताना महिलेनं गाडीतच दिला बाळाला जन्म

महाराष्ट्र बुलेटिन : आपण आजवर अनेक लोकप्रतिनिधी बघितले असतील, त्यांनी केलेल्या कामाची वाहवा ऐकली असेल. परंतु अतिशय कठीण वेळी निम्म्या रात्री प्रसंगावधानपणा दाखवून मदतीला धावून जाणे फार क्वचितच नेत्यांना जमते. याची प्रचिती समस्त संभाजीनगर वासीयांना आली आहे.

घडलेला प्रसंग असा की, संभाजीनगर मधील विजयनगर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास एक महिला चक्कर येऊन जमिनीवर पडली. मध्यरात्रीच्या वेळी घरात अशी घटना घडल्यावर घरातल्या लोकांना काय करावे ते काहीच सुचत नव्हते. अशा परिस्थितीत कुणाला बोलवावे हा मोठा प्रश्न त्यांना सतावत होता, तेवढ्यात त्यांची नजर घरात अडकवलेल्या दिनदर्शिकेवर पडली.
त्या दिनदर्शिकेवर ठळक अक्षरात लिहिले होते की, “सदैव आपल्या सेवेत” आपला राजेंद्र जंजाळ. त्यांनी लगेचच सदर घडलेल्या प्रकरणाची माहिती राजेंद्र जंजाळ यांना दिली आणि विशेष म्हणजे क्षणाचाही विलंब न करता राजेंद्र जंजाळ हे स्वतःची गाडी घेऊन त्यांच्या घरी पोहोचले.
या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. महिलेस प्रचंड त्रासही होत असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची वाट बघण्यात वेळ न दवडता त्या महिलेला स्वतःच्या गाडीतूनच रुग्णालयात नेण्याचे ठरवले.

शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये सुरु असलेल्या मोफत लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

मात्र या दरम्यान घरच्यांची बिकट परिस्थिती असल्याकारणाने त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांना घाटीत जाऊ असा आग्रह धरला, मात्र वेदना बघून राजेंद्र जंजाळ यांनी “तुम्ही खर्चाची चिंता करू नका, उपाय होणं गरजेचं आहे” असे सांगून जवळच्या उमंग रुग्णालयात सदर महिलेस भरती करण्याचे ठरवले.
पण प्रसूती कळा इतक्या प्रचंड होत्या की,रस्त्यात गाडीतच या महिलेची प्रसूती झाली. रात्रीची सूनसान वेळ, सामान्य माणसाला काय करावं कळणार नाही अशा परिस्थितीत राजू भाऊंनी फोन करून बालरोगतज्ज्ञांना घटनास्थळी बोलावून घेतले. डॉक्टरांनी बाळ आणि बाळाच्या आईला तपासून दोघेही सुखरूप असल्याची ग्वाही दिली आणि त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या बाळाला राजू भाऊ आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी सुखरूप रुग्णालयात दाखल केले. सध्या आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप आहेत.
नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे अनेक नेते असतील पण निम्म्या रात्री जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले राजेंद्र जंजाळ हे देवदूत बनून मिसाळ कुटुंबासाठी धावून आले. याबद्दल कुटुंबीयांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
 

Leave a comment

0.0/5