Skip to content Skip to footer

पाकमध्ये परतताच शरीफ यांना अटक

Nawaz Sharif Arrestedलाहोर : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे आज लंडनहून मायदेशी परतताच त्यांना लाहोर विमानतळावरच अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या मरियम यांनाही याच आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या तपास संस्थेने त्यांचे पासपोर्ट जप्त केले आहेत.

पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. शरीफ येणार असल्याने लाहोरमध्ये त्यांच्या समर्थकांनी रस्त्यारस्त्यांवर मोर्चे काढत घोषणाबाजी केली. त्यांच्या स्वागतासाठी शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) पक्षाचे हजारो समर्थक लाहोर विमानतळाच्या परिसरात जमले होते. मात्र, लष्कराने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जवळपास दहा हजार पोलिस शहरभर बंदोबस्तासाठी तैनात केले होते. शरीफ यांना अटक करून तातडीने खासगी जेट विमानाने इस्लामाबादला नेऊन तेथे त्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे; तसेच रात्रीच रावळीपिंडी येथील अडियाला तुरुंगात हलविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे एकूण तीन आरोप आहेत. त्यापैकी बेकायदा संपत्ती जमवून लंडनमध्ये मालमत्ता निर्माण केल्याबद्दल शरीफ यांना दहा वर्षांची; तर मरियम यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. शरीफ यांच्या जावयालाही याचप्रकरणात अटक झाली आहे. नवाज शरीफ यांची पत्नी कर्करोगाने आजारी असल्याने शरीफ लंडनमध्ये होते. शरीफ हे त्यांना झालेल्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्‍यता आहे.

Leave a comment

0.0/5