पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून अवघ्या ६० किमीवर असलेल्या गावात लोक प्राचीन मानवाप्रमाणे गुहेत राहत असतील यावर विश्वास ठेवणे कदाचित कठीण जाईल. मात्र ही सत्य परिस्थिती आहे. इस्लामाबादच्या उत्तर पश्चिम भागात हसन अब्दल या गावात सुमारे ३ हजार लोक गुहेत घर करून राहत आहेत. यामागे मुख्य कारण आहे ते पाकिस्तानात घरांच्या किंमतीत झालेली वाढ. विशेष म्हणजे हि गुहा घरे भूकंप आणि बॉम्बरोधी आहेत. शिवाय शहरी घरांपेक्षा स्वस्त आहेत.
ही घरे बनविण्यासाठी लोक हातानेच गुहा खोदतात. आतील भिंतीना मातीचा गिलावा केला जातो. हा भाग प्राचीन काळात मोंगलानी वासविलेला असून गेली पाच शतके येथील लोक गुहेत राहत आहेत असे सांगितले जाते. विशेष म्हणजे हि गुहा घरे उन्हाळ्यात थंड राहतात तर हिवाळ्यात उबदार असतात असे समजते. मातीचे घर पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती असते ती भीती या घरांना नाही.
शहरी भागात घरांच्या किमती अडीच लाख रुपयांपासून सुरु होतात त्यामानाने ही गुहेतील घरे ४० हजार रुपयात बनतात आणि अधिक टिकाऊ असतात. अर्थात या घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश खूप येत नाही त्यामुळे विजेच्या दिव्यांचा वापर सतत करावा लागतो आणि पाण्याची सोय घराबाहेर केली जाते.