Skip to content Skip to footer

वाहतूक कोंडीमुळे रोजगारावर कुऱ्हाड?

कल्याण : करोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कार्यालय गाठण्यासाठी दररोज तासन्तास वाहतूक कोंडीत सापडणारे कल्याण-डोंबिवलीकर आता मानसिक आजारांचे बळी पडू लागले आहेत. मुंबई, ठाण्याच्या दिशेने ये-जा करताना येथील नोकरदारांना शिळफाटा, कोन, भिवंडी, दुर्गाडी परिसरांत होत असलेल्या असह्य़  कोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे. यामुळे कामावर लेट मार्क लागणे, नोकरीच्या ठिकाणी ताण वाढणे, असुरक्षितता अशा कारणांनी अनेकांना ग्रासले असून नोकरी जाण्याची भीती वाटू लागली आहे.

मुंबई, ठाण्यातील खासगी कंपन्या सुरू असल्याने कल्याण, डोंबिवली भागांत राहणारे खासगी कंपन्यांतील हजारो कामगार हे खासगी वाहनांनी मुंबई आणि ठाणे गाठू लागले आहेत. मात्र या परिसरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे कामगारांना दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम या नोकरदारांच्या कामावर होऊ लागला आहे.

द होरायझन टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत असलेल्या सुशांत सोनार यांनी आपली व्यथा मांडली. सध्या आम्ही आठवडय़ातून दोन दिवस कार्यालयातून काम करतो आणि इतर दिवस घरून काम करतो. लोकल बंद असल्यामुळे टिटवाळा येथून कार्यालयात पोहोचण्यासाठी सकाळी बस किंवा रिक्षाने कल्याण येथे जातो. टिटवाळा येथे बससाठी बरीच गर्दी असते. रांगेत साधारण अर्धा तास लागतो. त्यानंतर कसेबसे कार्यालयात पोहोचतो.

मी टिटवाळा ते फोर्ट प्रवास करतो. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. दररोज पेट्रोलवर होणाऱ्या खर्चामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. शिवाय कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जी नोकरकपात सुरू आहे, त्यात आपले तर नाव पुढे नसेल ना याची चिंता सतावत राहाते.

– पंकज कोकाटे, टिटवाळा

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे कामावरही त्याचा परिणाम होत असतो. अशा वेळी कामगारांनी आपण वाहतूक कोंडीत अडकणार या मानसिकतेनेच घर सोडावे. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे होणारी चिडचिड कमी होईल. प्रवास करताना चांगली गाणी ऐकावी किंवा एखादी नवी कला शिकण्यात वेळ घालवावा. दुचाकी चालविणाऱ्यांनी  दुचाकीवरू न खाली उतरल्यानंतर स्नायू ताणले जातील अशी आसने करावीत.

 – डॉ. यश वेलणकर, मानसोपचारतज्ज्ञ

ठाणे येथे आय.टी. सव्‍‌र्हिसेसचे आमचे कार्यालय आहे. आमच्या व्यवसायामध्ये जरी घरून काम करणे शक्य असले, तरीही कार्यालयीन बैठका, कामाचा आढावा अशा गोष्टींसाठी प्रत्यक्ष भेटणे गरजेचे असते. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे कामावर खूप परिणाम झाला आहे.

– स्वप्निल दाभाडे, संस्थापक, द होरायझन टेक्नॉलॉजी, ठाणे

Leave a comment

0.0/5