Skip to content Skip to footer

मुंबई Power cut संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुख्यमंत्र्यांची पॉवरकट प्रकरणी उर्जा मंत्र्यांशीही चर्चा

मुंबईतल्या पॉवर कट अर्थात वीज पुरवठा खंडीत झाल्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. वर्षा या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, उर्जा सचिव असीम गुप्ता यांचाही सहभाग असणार आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि इतर भागांमध्यल्या पॉवरकट संदर्भात उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून निर्देशही दिले. आता याच प्रकरणी त्यांनी एक बैठक बोलावली आहे.

मुंबईमध्ये आज (सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान दिवसभरात काय घडलं? दुरुस्तीचं काम कुठवर आलं? या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री बैठकीत घेणार आहेत. दरम्यान हा सगळा बिघाड का झाला याची चौकशी होणार असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a comment

0.0/5