पिंपरी (पुणे) : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबून आवाज केले. तसेच विनापरवाना हातात तलवार घेत घोषणा दिल्या. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहाच्या सुमारास निगडीतील यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान यादरम्यान घडला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई विकास नीलचंद दुधे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितीन वाटकर या पदाधिकाऱ्यांसह २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना शोभायात्रा काढली. त्यातील चार मुलींच्या हातात एअर रायफल होत्या. त्याचे ट्रिगर दाबून आवाज केला जात होता. तर पाच मुली हातात तलवार घेऊन घोषणा देत होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.