पुणे – राज्यात अवयवदानात अव्वल असलेल्या पुण्याने पहिले फुफ्फुसदान बुधवारी केले. दान केलेले हे फुफ्फुस चेन्नईतील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. त्यामुळे मुंबईनंतर फुफ्फुसदान करणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. नातेवाइकांनी परवानगी दिल्याने मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) २२ वर्षीय मुलीच्या फुफ्फुसासह यकृत, हृदय आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली. त्यामुळे पाच रुग्णांचे प्राण वाचले.
ती मुलगी चौथ्या मजल्यावरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला होता. तिला उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले होते. मात्र तिचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. यातच तिच्या मेंदूचे कार्य थांबले. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ब्रेन डेड’ म्हटले जाते. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवकांनी मुलीच्या नातेवाइकांना अवयवदानाचे आवाहन केले. त्याला रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रतिसाद दिला. त्या मुलीचे फुफ्फुस, हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान केले. त्यापैकी फफ्फुस हे प्रथमच दान करण्यात आल्याची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी दिली. चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षीय महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी झाले.
अवश्य वाचा – केळी खातांना सावधान – 25-30 रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे!
पुणे ‘झोनल ट्रॉन्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी’च्या (झेटीसीसी) समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, ‘‘ब्रेन डेड झालेल्या मुलीचे अवयवदान करण्यासाठी मंगळवारी दुपारी नातेवाइकांनी संमती दिली. रुग्णाच्या डोक्याला मार लागल्याने इतर अवयवांचे कार्य सुरू होते. त्यांना इजाही झाली नव्हती.
त्यामुळे मूत्रपिंड, यकृतासह हृदय आणि फुफ्फुसदेखील दान करता येईल असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे हृदय मुंबईतील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. डॉक्टर हे हृदय रात्री वाहनाने मुंबईला घेऊन गेले. रात्री १ वाजून ५० मिनिटांनी हृदय घेऊन पुण्यातून निघालेली रुग्णवाहिका पहाटे तीन वाजून ३८ मिनिटांनी मुलुंडला पोचली. तसेच फुफ्फुसदेखील रात्री तीन वाजता विशेष विमानाने चेन्नईला रवाना करण्यात आले. त्यासाठी चेन्नईच्या रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पुण्यात आले होते. तसेच रूबी हॉल क्लिनिकमधील गरजू रुग्णाच्या शरीरात यकृत आणि एक मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड सोलापुरातील रुग्णालयात मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला देण्यात आले.’’
‘‘शहरातील पहिले फुफ्फुसदान बुधवारी झाले,’’ अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय समाजसेविका सुरेखा जोशी
यांनी दिली.
पुण्यातील २९ वा ग्रीन कॉरिडॉर
अवयव घेऊन जाण्यासाठी संपूर्ण रस्ता निर्मनुष्य करणे, याला ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हटले जाते. ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१७ या दरम्यान २९ वेळा शहरात ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आले. रुग्णालयापासून विमानतळापर्यंत किंवा इतर शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवर हे ग्रीन कॉरिडॉर झाले आहेत. यात वाहतूक पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली असल्याचेही गोखले यांनी सांगितले.
प्रत्यारोपणाचा कालावधी
हृदय ४ तास
फुफ्फुस ६ तास
यकृत ६ ते १२ तास
मूत्रपिंड ८ तास
आठ महिन्यांतील पुण्यातील अवयवदान
मूत्रपिंड ५२
यकृत ३२
मूत्रपिंड आणि स्वादुपिंड १
हृदय ७