पुणे : पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं आणि दिमाखात साजरा करतीये. जगाच्या नकाशावर पुण्याचा उल्लेखनीय ठसा उमटवण्यासाठी पुण्याच्या गणेशोत्सवाचाही मोलाचा वाटा आहे. पुण्याची ओळख असलेल्या या अविष्कारी गणेशोत्सवाच्या या १२५ वा गणेशोत्सव सोहळ्याच्या मुकुटात पुणे महानगर पालिका मानाचे दोन शिरपेच बसविणार आहे.
या सोहळ्यातील अनेक उपक्रमांपैकी दोन उपक्रमांची नोंद थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये होणार आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती, शालेय विद्यार्थ्यांकडून विक्रमी संख्येने एकाच वेळेस बनविले जातील आणि दुसरा उपक्रम म्हणजे पुण्यातील हजारो तरुण-तरुणी ढोल ताशा वादक शिस्तबद्ध रित्या एकत्रितपणे आपला वादनाविष्कार सादर करतील ! या दोन विश्व विक्रमांमुळे पुणे आणि पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अधोरेखित होईल.
https://maharashtrabulletin.com/ganesh-festival-ganeshotsav/
पुणे मनपाच्या या महत्वाकांक्षी विश्व विक्रमी उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील १२५ नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवार दिनांक २४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. श्री गणेशाला भारतीय संस्कृतीत, ६४ कलांचा अधिपती मानले जाते. विविध कलांच्या या दैवताला, विविध कलांचे उपासक पारंपरिक वेशात आपली सेवा श्रींच्या चरणी रुजू करतील. पुणे शहरातील चित्रपट, नाट्य, कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री,गायक – वादक, नर्तक, रंगभूमीवरील रंगकर्मी,तंत्रज्ञ, निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक -आयोजक आणि व्यावसायिक श्री गजाननाला, येणारा गणेशोत्सव शांततेत,निर्विघ्नपणे, एकोप्यानं आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून एकत्रितपणे साकडं घालतील. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मान मिळवलेल्या पुण्यात, हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या कलाकारांसह अनेक संस्था सुद्धा पुढे आल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद – पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, एकपात्री कलाकार पुणे , शाहीर परिषद , M.A.P पुणे ,बालगंधर्व परिवार , लोककला-लावणी निर्माता व कलावंत संघ , नाट्य निर्माता संघ , ऑर्केस्ट्रा निर्माता संघ , रंगभूमी सेवक संघ , नृत्य परिषद , Sound – Light – Generator Association या संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सभासद या महाआरतीत सहभागी होणार आहेत.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होऊन महानगरपालिकेच्या या उपक्रमांना शुभेच्छा देण्याचे आवाहन या विविध संस्थांनी आणि रंगकर्मींनी पत्रकार परिषदेत केले आहे.