Skip to content Skip to footer

ऐन दुष्काळात पुण्यातील रस्त्यावर धोधो पाणी 10 तासांपासून पाईपलाईन फुटलेली

पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या महापालिकेने गुरुवारी रात्री मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लीटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर भागात व्हॉल्व फुटल्याने रात्री 11.30 पासून सकाळपर्यंत धोधो पाणी वाहत होते.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचे उंच कारंजे उडत होते.  गुरूवारी रात्री साडेअकरा वाजल्यापासून पाणी वाहत असल्याची माहिती  स्थानिकांनी दिली मात्र हि बाब  आज सकाळी सात वाजता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना समजली. तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.  सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. संपुर्ण शहरात पाणीकपातीचे संकट असताना अशा प्रकारे पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

अचानक पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्यामुळे संपुर्ण विमाननगर परिसर जलमय झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना रात्री जोरदार पाऊस झाल्याचे वाटत होते. मात्र, वस्तूस्थिती कळल्यावर पालिकेच्या नावे संताप व्यक्त करण्यात येत होता. दुष्काळामध्येच एशा प्रकारे पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य असा सवालही विचारण्यात येत होता.

विमाननगर दत्त मंदिर चौकात हाकेच्या अंतरावर स्थानिक नगरसेविका व नगरसेवक राहतात. शिवाय उपमहापौरांचे निवासस्थान देखील विमाननगर प्रभागातच आहे. तर नगररोडच्या लागलीच पलिकडे आमदारांचे निवासस्थान आहे. एवढे माननीय असणाऱ्या विमाननगर प्रभागात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्याशी संपर्क  
स्थानिक नागरिकांनी अनेकदा संपर्क करून देखील त्याची नोंद घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरूवातीला “व्यस्त” व नंतर “सध्या पोहचू शकत नाही ” असा अनुभव आला. तर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्हि.जी. कुलकर्णी यांना सकाळी दहा वाजता हा प्रकार समजला. एकंदरीतच लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याबाबत ढिम्म असल्याचे दिसून येते.

Leave a comment

0.0/5