Skip to content Skip to footer

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज स्विकारणार कार्यभार

खासदार गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला. निवडणुकीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात ते मोर्चेबांधणी करत असल्यामुळे पुण्यातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. शनिवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
पाटील कोल्हापूरचे असले तरी पुण्याशी त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यापासूनचा संपर्क आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात ते लोकसभा निवडणूक काळात ठाण मांडून बसले होते. पुण्यातील काही निवडक कार्यकर्ते त्यांनी मदतीला घेतले होते. खुद्द बापट यांनीच पाटील यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी असे सांगितले असल्याचीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत व त्याआधीपासून पाटील बापट यांचे संबंध चांगले आहेत.
पाटील शुक्रवारी दिवसभर मुंबईतच होते. सायंकाळी त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. शनिवारी ते नांदेड दौऱ्यावर आहेत. रात्री ते पुण्यात मुक्कामी असतील. रविवारी दिवसभर ते पुण्यातच थांबणार असून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आयोजित केलेल्या नदीसुधार प्रकल्पाच्या बैठकीला उपस्थित राहतील.

Leave a comment

0.0/5