Skip to content Skip to footer

‘बिल्डरशाही’ने गिळली ‘रामनदी’

‘‘आमच्या लहानपणी आम्ही रामनदीत पोहलो. याच नदीचे पाणीदेखील प्यालो. पण गेल्या काही वर्षांत बिल्डरशाहीने रामनदीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. नदीच अस्तित्वच न राहिल्याने पुनरुज्जीवन कशाचे आणि कसे करणार? केवळ गाळ काढणे, प्लॅस्टिकबंदी करून काय उपयोग होणार? मुळावर घाव घातल्याशिवाय काही होणार नाही,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया ‘राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच’ उद्घाटन कार्यक्रमातच स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केली.

मुळशी तालुक्यात उगम असलेली रामनदी वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणात उभा राहिलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

यामुळे रामनदी पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी पुणे शहर आणि परिसरातील विविध १३ स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा आरंभ मंगळवार (दि.४) रोजी खाटपेवाडी तलाव येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, माधुरी सहस्रबुद्धे, किर्लोस्कर ऑइल कंपनीचे सीईओ आर. आर. देशपांडे याच्यासह सर्व १३ स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, स्थानिक गावांमधील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राम नदीला गतवैभव देऊ
* महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पाण्याचा, नद्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न केवळ पुणे महापालिका,  ग्रामपंचायतींचा किंवा तुमचा, आमचा किंवा त्यांचा राहिला नसून, तो जागतिक झाला आहे. त्यामुळे रामनदीचे पुनरुज्जीवनासाठी महापालिका हद्दीच्या बाहेरदेखील विशेष बाब म्हणून पूर्ण मदत करण्यास तयार आहे.

* रामनदीच्या पुनर्जीवन अडथळा आणणाऱ्या , राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही टिळक यांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिकेने रामनदीवर आतापर्यंत ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, याचा प्रत्यक्ष काही फायदा झालेला दिसत नसल्याचे सांगत आता स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थांचा पुढाकारातून रामनदीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5