मोहन जोशींचा भाजपला सवाल ; कुठे नेऊन ठेवलं पुणं आमचं ??

मोहन-जोशींचा-भाजपला-सवाल-Mohan-Joshi's question to BJP

पुणे शहरात करोना साथीचा कहर झाला असून हे शहर देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. भाजपाच्या निष्क्रीयतेमुळेच पुणेकर संकटात सापडले आहेत, असा आरोप करीत ‘कुठे नेऊन ठेवलंय पुणं आमचं?’ असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी भाजपाला केला आहे.

जोशी म्हणाले, “शहराचे आरोग्य उत्तम राखणे हे कायद्यानुसार महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु त्यात महापालिकेने कुचराई केली आहे. महापालिकेत भाजपाचे शंभर नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता ही पदंही भाजपाकडेच आहेत. पण या पदाधिकाऱ्यांकडून स्टंटबाजी व्यतिरिक्त गांभीर्याने उपाययोजना झालेल्या नाहीत. राज्य सरकारने महापालिकेला दोन आरोग्य अधिकारी दिले. ऐन साथीच्या काळात ते रजेवर गेले. त्यांना रजेवर कसे जाऊ दिले? पालिकेवर कोणाचे नियंत्रण नाही का? राज्य सरकारने जंबो केअर सेंटर बांधले ते चालविण्यासाठी पुणे महापालिकेकडे सोपविले. महापालिकेच्या स्थायी समितीने अकार्यक्षम ठरलेल्या संस्थेला टेंडर काढून काम दिले, त्यातून गोंधळ झालाच.”

“या सेंटरमध्ये उपचारांअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यासाठी भाजपलाच जबाबदार धरायला हवे. तसेच एका खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडातून दळवी रुग्णालयाचे आधुनिकीकरण झाले. तिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण, ते रुग्णालय आजमितीला वापरले जात नाही. ही भाजपचीच निष्क्रीयता आहे. डॉ. नायडू रुग्णालयात ऑक्सिजनची टाकी उभारायला हवी होती. ती साथीच्या काळात आवश्यक असूनही का उभारली गेली नाही? ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना याकडे दुर्लक्ष का झाले? या निष्क्रीय कारभाराची किंमत पुणेकरांना मोजावी लागत आहे,” असे आरोपही जोशी यांनी केले आहेत.

जोशी म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुण्यासाठी आठ कॉर्डियाक अॅम्ब्युलन्स दिल्या, पण पंतप्रधानांचे जवळचे समजले जाणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सात महिने उलटून गेल्या तरी बैठका घेतात, त्यातही ठोस घोषणा करीत नाहीत. खासदार गिरीश बापट, जावडेकर दोघे मिळून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी जादा सुविधा मिळवू शकलेले नाहीत. अशावेळी या दोघांना पुणेकरांचे प्रतिनिधी असे का म्हणायचे? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील आणि अन्य आमदार इतर गोष्टींचे राजकारण करत बसतात. पण, पुण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. ही बाब चीड आणणारी आहे. प्रत्येक पुणेकर काळजीत आहे, त्यासाठी प्रकाश जावडेकर यांनी ठाण मांडून प्रशासनाला हलवायला हवे होते,”
पुण्यात शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, आयटी तज्ज्ञ आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स, औषधी क्षेत्रातील सल्लागार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा अशावेळी करून घेणे गरजेचे आहे. त्यातही भाजपाचे महापौर, खासदार, आमदार कमी पडले आहेत. त्यांच्याशी संवादही साधलेला नाही. पुणेकरांनी भाजपाला भरभरून दिले पण भाजपाने बिकट प्रसंगात पुण्यासाठी काहीही केले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here