Skip to content Skip to footer

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणतात; ‘ते’ प्रकरण माझ्यासाठी फक्त एक ‘इन्सिडंट’

वाधवान प्रकरणावर केलं भाष्य

वाधवान प्रकरण माझ्यासाठी फक्त एक घटना होती आणि ते आता संपले असल्याचं वक्तव्य पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्या दरम्यान गृहविभागात मुख्य सचिव पदावर कार्यरत असलेले अमिताभ गुप्ता यांनी त्यावेळी वाधवान कुटुंबाला व्हीआयपी पास मिळवून दिल्याचं सांगण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर नंतर विरोधकांकडून टीकादेखील करण्यात आली. त्या घटनेला काही दिवस होत नाही तोवर राज्य सरकारमार्फत पुणे पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे गुप्ता यांना राज्य सरकारकडून पुण्याच्या आयुक्त पदाचे गिफ्ट देण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर गुप्ता यांना प्रश्न विचारण्यात आला. “ते प्रकरण माझ्यासाठी फक्त एक घटना होती आणि ते आता संपले आहे, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. तसंच या सर्वांत नागरिकांचंही सहकार्य अपेक्षित असल्याचं म्हटलं. पोलिसांनाही करोनाची बाधा होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याकडे आम्ही गांभीर्यानं पाहत आहोत. आम्ही सर्वांची सतत माहिती घेत असतो. तसंच पोलीस कोणत्या रुग्णालयात आहेत त्यांना कोणती औषधं देण्यात येत आहेत याचीही आम्ही माहिती घेत असतो. आम्ही व्यक्तीश: संपर्कात आहोत. ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मृत्यूंचा आकडा वाढू नये यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5