Skip to content Skip to footer

अजित पवारांनी दिला इशारा, तूर्तास तरी पुण्यात लॉकडाऊन नाही, परंतु…

महाराष्ट्र बुलेटिन : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतीत त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापौर व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की, ‘सध्या तरी पुण्यात लॉकडाऊन केले जाणार नाही, मात्र नियमांची अंमलबजावणी ही कठोरपणे केली जाईल. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

प्रशासनाकडून १ ते १४ एप्रिल या कालावधीत पुणे शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावावर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सूचना केली की, लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी १ एप्रिलला पुन्हा बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा. या चर्चेदरम्यान अजित पवारांनी सध्या तरी लॉकडाऊन न करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

तसेच अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत की, जिल्ह्यामधील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करून ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करा आणि मनुष्यबळ कमी पडत असेल तर त्यास वाढावा. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड्स राखीव करण्यात यावे अशा सूचना अजित पवारांनी प्रशासनाला केल्या आहेत.

बैठकीत अजित पवार काय म्हणाले?

– ठरलेल्या वेळापत्रकानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येतील.
– लसीकरण केंद्र वाढविण्यास प्राधान्य दिले जाईल.
– दहावी बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील, मात्र शाळा व महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंदच राहतील.
– होळीचा सण सार्वजनिक पद्धतीने साजरा करू नये.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
– उद्याने सकाळी सुरू तर रात्री बंद राहतील.
– हॉटेल्स मागील नियमांप्रमाणेच ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, मात्र रुग्णसंख्या वाढल्यास हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
– विवाह समारंभाला ५० लोकांची उपस्थिती तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
– संचारबंदीमध्ये कुठलेही बदल करण्यात आले नसून रात्री ११ ते सकाळी ६ ही वेळ कायम ठेवण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5