‘विकेल ते पिकेल’ शेतीमालाला देईल हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध कृषी विषयक योजनांच्या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी शेतीविषयक येणाऱ्या अडचणी संबंधी त्यांच्याशी संवाद साधत चर्चा केली.
शेतकऱ्यांनी संघटित होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठेत जास्त मागणी आहे ते पीक पिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आणली पाहिजे. या कृषी प्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. आज शेतकरी संघटित होणे जिकरीचे आहे, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भावना यावेळी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन वेळोवेळी निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी जावे लागू नये यासाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मा. बाळासाहेब ठाकरे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला साजेसे असे काम या योजनांच्या माध्यमातून करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.