कंगना रानौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

बड्या-भाजपा-नेत्याच्या-च-Big-BJP-leader-ch

कंगना रानौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी सिने-अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बांद्रा कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर १२ तासाच्या आत मुंबई पोलिसांनी कंगना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कंगनाने ट्विटच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुन्नावरली सय्यद यांनी केला. याबाबत वांद्रे न्यायालयात त्यांनी तक्रार केली होती.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने ट्विट करून बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका केली होती. तसेच याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस नीट करत नसल्याचा आरोप करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तसेच त्यावरून शिवसेनेलाही लक्ष्य केले होते.

कंगनाविरोधात याचिका दाखल करणा-यांनी म्हटले होते की, ती बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमापासून ते टीव्हीवर सगळीकडे बॉलीवूडच्या विरोधात बोलत आहे. कंगना रनौत तिच्या ट्विट्सच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ धार्मिक भावनांना ठेच पोहोचत नाहीये तर इंडस्ट्रीतील कित्येक लोक दुखावले गेले आहेत. त्यामुळे कंगनावर जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावला गेला होता.

या प्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात कंगनाचे ट्विट्स सादर केले. त्यानुसार कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १२४ नुसार देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here