पर्यटन धोरण – २०१६ मधील तरतूदीनुसार तसेच कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे २ भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार देखील वाढेल. पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत उपलब्ध प्रोत्साहने जसे की, मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट इ. कॅरॅव्हॅन पार्क / कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू राहतील.
पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील. कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिद्धी देखील करण्यात येईल.
या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, अविकसित क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.