Skip to content Skip to footer

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील घुबडांचा बळी

बंगळुरू: तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घुबडांची तस्करी वाढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे घुबड कर्नाटकातून मागविण्यात येत आहेत. एका घुबडाची किंमत पाच लाखांच्या घरात असल्याची माहितीही मिळाली आहे. कर्नाटकात कलबुर्गी जिल्ह्यात तेलंगणा सीमेजवळ सेदाम तालुक्यात इंडियन ईगल आऊलच्या तस्करीप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही धक्कादायक महिती मिळाली आहे. तेलंगणात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रात्री जागणाऱ्या घुबडासारख्या पक्षांची मागणी या तस्करांकडे केली होती. तंत्रसाधनेच्या मदतीने विरोधकांचे गुडलक बॅडलकमध्ये बदलण्यासाठी घुबडाचा वापर होत असल्याचे सांगण्यात आले. देशाची विकासाकडे वाटचाल सुरू असताना अशा अंधश्रद्धांच्या घटना उघड होत आहेत.

परदेशात रात्री जागणाऱ्या पक्षांना बुद्धिमत्तेचे प्रतीक मानण्यात येते. तर आपल्याकडे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानण्यात येते. तसेच रात्री जागणारे पक्षी एखाद्याच्या नशिबात वाईट गोष्टी घडवून आणू शकतात अशी मान्यता आहे. त्यासाठी तंत्रविद्येत त्यांचा वापर करण्यात येतो. आपल्या नशिबाने आपल्याला साध द्यावी आणि प्रतिस्पर्धी नशिबाच्या दुर्दशेत अडकावा यासाठी तंत्रविद्येत त्यांचा वापर करण्यात येतो. अंधश्रद्धेमुळे दुर्मिळ होत असलेल्या या पक्ष्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटनांनी पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. घुबडाचा बळी देण्यासोबतच त्याचे पंख, डोळे, पाय उपटून त्यांचीही विक्री होत आहे. घुबडाचा वापर करून तंत्रविद्येने आपला विजय होईल अशी फोल आशा असल्याने अनेक राजकीय नेत्यांकडून पक्ष्यांचा हकनाक बळी जात आहे.

याआधी बंगळुरूतून तीन, म्हैसूरमधून तीन आणि बेळगावातून दोन अशीच प्रकरणे उघड झाली आहेत. अमावस्या, लक्ष्मीपूजन आणि इतर वेळीही घुबडांची मागणी वाढत आहे. आता तेलंगणातील निवडणुकीमुळे आता घुबडांची मागणी वाढली आहे. तस्करीप्रकरणी सहाजणांना अटक झाल्याने या प्रकरणातील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घुबड जंगलात असल्याने याप्रकरणात आणखी काहीजण गुंतल्याची शक्यता आहे. घुबड त्याची मान 270 अंशात फिरवू शकत असल्याचे त्याला गुप्तधनाची माहिती असते अशीही मान्यता आहे. दुर्मिळ असणाऱ्या घुबडांची आणि अशा पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी यामागील अंधश्रद्धा उघड करून जनजागृती करण्याची गरज पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5