Skip to content Skip to footer

१६ व्या बाळंतपणानंतर महिलेचा मृत्यू; बाळही दगावलं

यापूर्वी महिलेने १५ मुलांना जन्म दिला होता

मध्य प्रदेशमधील दामोह जिल्ह्यामध्ये एका ४५ वर्षीय गरोदर महिलेच्या मृत्यू झाला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला आपल्या १६ व्या बाळाला जन्म देत होती, मात्र आईबरोबरच या बाळाचाही दूर्देवी मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव सुखराणी अरिवार असं असल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला दामोह जिल्ह्यातील पदाजीहीर गावात राहत होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेअंतर्गत (एनआरएचएम)  काम करणाऱ्या अ‍ॅक्रीडेटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टीव्हीस्ट (आशा) संस्थेसाठी काम करणाऱ्या कल्लोबाई विश्वकर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार या महिलेने शनिवारी एका मुलाला जन्म दिला. या महिलेची प्रसुती तिच्या घरीच करण्यात आला. “मात्र बाळाच्या जन्मानंतर या महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. तेथे या दोघांना मृत घोषित करण्यात आलं,” असं कल्लोबाई यांनी सांगितलं आहे.

कल्लोबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सुखराणी यांनी यापूर्वी एकूण १५ बाळांना जन्म दिला होती. त्यापैकी सात बाळांचा मृत्यू झाला असंही कल्लोबाईंनी स्पष्ट केलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता त्रिवेदी यांनी या महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Leave a comment

0.0/5