Skip to content Skip to footer

देशाच्या सीमेवरील दुश्मनांबरोबर लढण्यासाठी ईडी आणि सीबीआयला पाठवा! – सामना

 

देशाच्या सीमेवरील दुश्मनांबरोबर लढण्यासाठी ईडी आणि सीबीआयला पाठवा! – सामना

कश्मीर आणि लडाख या देशाच्या सिमेवर आपले सैन्य दुश्मनांशी लढत आहे. त्याच्या जोडीला ईडी आणि सीबीआयला पाठवा, असा खोचक सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आलेला आहे. भाजप सरकार सातत्याने विरोधकांविरोधात ईडी आणि सीबीआय या यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व मुंबई, ठाण्यातील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले, तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर केंद्र सरकार ईडीचा वापर राजकीय विरोधकांविरोधात करत असल्याचा आरोप शिवसेनेने यापूर्वीच केला होता. त्यानंतर आज ‘सामना‘ या शिवसेनेच्या मुखपत्रच्या अग्रलेखामधून शिवसेनेने या कारवाईविरोधात आवाज उठवला आहे.

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, “लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही”.

“पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील”, असे देखील या अग्रलेखात म्हटले गेले आहे.

Leave a comment

0.0/5