Skip to content Skip to footer

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी आता ममता बॅनर्जी यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दावा केला आहे. बॅनर्जी या देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी असून त्या खूप आधीपासून या पदाच्या दावेदार आहेत, असे त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी काँग्रेसेतर पक्षातील नेत्यांचीही नेतृत्व स्वीकारण्याची तयारी काँग्रेसने मंगळवारी दर्शविली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या वतीने हा दावा करण्यात आला आहे.

‘वर्ष 2019 हे संघराज्याचा विचार करण्याचे वर्ष असून त्यादृष्टीने ममता बॅनर्जी या प्रबळ दावेदार आहेत. पंतप्रधानपदासाठी आघाडीच्या दावेदार म्हणून त्या पुढे येणे यात काहीही नवीन नाही,’ असे पक्षाचे प्रवक्ते डेरेक ओ’ब्रायन यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

‘सध्या प्रत्येक जण भाजपला सत्तेतून घालविण्यात आणि लोकाभिमुख सरकार आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. यादृष्टीने सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी ममता बॅनर्जी या एक आहेत. बॅनर्जी यांना केवळ पश्‍चिम बंगालच्या लोकांनी नव्हे तर देशभरातील लोकांनी त्यांच्या 40 वर्षांच्या राजकीय संघर्षासाठी स्वीकारलेले आहे,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, कोलकता येथे तिसऱ्या आघाडीच्या पक्ष्यांची एक सभा घेण्याची ममता यांची योजना आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यासाठी त्या पुढील आठवड्यात दिल्लीला येणार आहेत.

Leave a comment

0.0/5