Skip to content Skip to footer

उत्तर कर्नाटक : पुन्हा वेगळ्या राज्याची मागणी, दोन ऑगस्टला बंद

उत्तर कर्नाटक भागातील जिल्ह्यांचे वेगळे राज्य करण्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली असून येत्या दोन ऑगस्ट रोजी या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली आहे.

उत्तर कर्नाटक होराट समिती या संघटनेने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. राज्य सरकार उत्तर कर्नाटकाला सापत्न भावाची वागणूक देत असून याच्या निषेधार्थ 2 ऑगस्ट रोजी बंद पाळण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सोमशेखर कोटंबारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर कर्नाटकातील 13 जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात येईल.

‘कर्नाटकच्या उत्तर भागातील जिल्ह्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. आमच्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या वर्षीच्या अर्थसंकल्पात (2018-19) उत्तर भागातील जिल्ह्यांसाठी किरकोळ तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने उत्तर कर्नाटक साठी फारसे काम केले नाही आणि हाच प्रकार पुढेही चालू राहील असे दिसत आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकचे वेगळे राज्य करावे या मागणीसाठी आम्ही बंद पाळणार आहोत,’ असे कोटंबारी म्हणाले.

महादयी नदी तंटा सोडविण्याबाबत सरकारने केलेल्या दुर्लक्षाचाही संघटनेने निषेध केला आहे. हा तंटा त्वरित सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रस्तावित राज्यात गुलबर्गा विजापुर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5