धाराशिव: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे येत्या 24 डिसेंबर रोजी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे येत असून त्याठिकाणी त्यांची अभुतपूर्व अशी सभा होणार आहे. तेव्हा या सभेसाठी धाराशिव जिल्ह्यातून किमान दीड लाख शिवसैनिक अपेक्षीत असून ही सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून कामाला लागावे व पक्षप्रमुखांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज धाराशिव येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पंढरपूर येथे होणाऱ्या सभेचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी जत्रा फक्शन हॉल येथे जिल्ह्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार डॉ. सावंत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, प्रा. गौतम लटके, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे, जिल्हा समन्वयक दत्ता साळुंके, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख नितीन लांडगे, जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे, डॉ. चेतन बोराडे व धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुटुंबाबाहेरील उमेदवार राष्ट्रवादीने द्यावा
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस कधीही नात्यागोत्याच्या पलीकडे गेली नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाटील परिवाराने कुटुंबाबाहेरील उमेदवार देऊन दाखवावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी दिले.