नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 हून अधिक केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यावरून काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी एक खळबळजनक आरोप केला. यामध्ये त्यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ला ‘फिक्स’ केला.
पुलवामा हल्ला देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने हल्ला करून जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवरून अनेक शंका उपस्थित करून या कारवाईचे पुरावे मागितले होते. त्यानंतर सरकारकडून याचे पुरावेही देण्यात आले. मात्र, आता यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप केला आहे.
यामध्ये हरिप्रसाद म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी छुपी हातमिळवणी केली आहे. या दोघांची हातमिळवणी नसती तर हा हल्ला होऊच शकला नसता.