आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालूच आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यावर बोलताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे बालिशपणची लक्षणे आहे असेही थट्टा उडवली होती. पुढे म्हणताना तावडे म्हणाले की, मुस्लिम महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा रद्द करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आश्वासन म्हणजे मुस्लिम समाजातील महिलांना पुन्हा अंधाराच्या खाईत ढकलण्याचे कृत्य आहे, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर उत्तर देण्याचे आव्हान तावडे यांनी यावेळी दिले.
यावर खासदार सुप्रिया सुळे यांना तावडे यांनी दिलेले आव्हान स्वीकारतात का? हे पाहावे लागेल. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा बालिश असून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्तुतिनामा हा प्रश्नच आहे. दारुण पराभव होणार हे दिसायला लागल्यावर उसनं अवसानही आणता येत नाही हेच या जाहीरनाम्यातून दिसून येते, असे तावडे म्हणाले. तिहेरी तलाकचा निर्णय हा मोदी सरकारने मुस्लिम महिलांसाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे आणि आता याच निर्णयावर रेघोटे ओढण्याचे काम राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून दिसून येत आहे.