एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे घेत असलेल्या सभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या नावे टाकायचा असा प्रश्न निवडणूक आयोगा पुढे उपस्थित राहिलेला असताना महाआघाडीच्या बॅनरवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो झळकू लागले आहेत. त्यामुळे मनसेने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला उघड-उघड पाठिंबा जाहीर करावा अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येत आहे. कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या सभेसाठी आंबरनाथ शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. या बॅनरवर मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांचा फोटो टाकण्यात आलेला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात आपण काम करणार असल्याचे सभेत बोलून दाखविले होते. जिथे जिथे भाजपा उमेदवार आहेत तिथे तिथे त्यांना पाडा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेला होता. परंतु महाआघाडीत सामील होण्याचे कोणतेही भाष्य केले नव्हते. परंतु आंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांचा फोटो काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या बॅनरवर दिसल्याने ठाणे आणि आसपासच्या भागात राजकीय चर्चेला उधाण आले आहे या बद्दल जेव्हा कुणाल भोईर यांना विचारण्यात आले तेव्हा मोदी यांना पाडण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू पण फोटो कोणी टाकला या बद्दल भोईर यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही आहे.