लोकसभा निकालांच्या दोन दिवस आधी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा पक्षाच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक आणि डीनरचे आयोजन केले होते. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री, एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाची पंतप्रधान मोदींना आठवण करून दिली. तर दुष्काळासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणी केली.
यंदा राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतोय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. अशातच राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये दुष्काळ दौरा काढण्यात आला होता. तर दुष्काळी उपाय योजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून देखील मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये राज्यातील दुष्काळाचा मुद्दा मांडला. तर दुष्काळासाठी तत्काळ मदत करावी अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून दुष्काळ निधी मंजूर झाला होता. केंद्राकडून २१६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याआधी जवळपास २१०० कोटी रुपयांचा निधी केंद्राने राज्याला दिला होता. तर आता दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन केंद्राने महाराष्ट्र सरकारला आणखी २१६० कोटी रुपयांचा मदतनिधी दिला आहे.