Skip to content Skip to footer

मुंबईत महायुतीचा बोलबाला…….

मुंबईकरांनी सहाही मतदारसंघांत महायुतीच्याच उमेदवारांना भरभरून मतदान केले. याचा प्रत्यय निकालाच्या दिवशी आला असून सहाही मतदारसंघांत लाखालाखाच्या मताधिक्याने शिवसेनेचे सहाही शिलेदार विजयी झाले. उत्तर-पश्चिम मुंबईत शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, दक्षिण-मध्य मुंबईतून खासदार राहुल शेवाळे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी तर ईशान्य मुंबईतून मनोज कोटक हे सहाही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले.

मुंबईत २९ एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर महायुतीच बाजी मारणार हे स्पष्ट झाले होते. प्रतीक्षा होती ती निकालाची आणि किती मताधिक्याने उमेदवार निवडून येणार याची. मुंबईत रेकॉर्डब्रेक ५५ टक्क्यांवर मतदान झाले होते. उत्तर मुंबईत सर्वाधिक ५९ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी सर्वाधिक ४ लाख ५३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ गजानन कीर्तिकर यांनी २ लाख ५१ हजार मतांची आघाडी घेतली. उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत घाटकोपर, भांडुप, मुलुंड पट्टय़ात भरभरून झालेल्या मतदानाने मनोज कोटक यांचा विजय सोपा केला. तब्बल २ लाख २६ हजार मतांनी संजय दिना पाटील यांना त्यांनी धोबीपछाड दिले.

त्याचप्रमाणे दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांनी १ लाख ५२ हजार मतांच्या फरकाने सर्व अंदाज फोल ठरवले. उत्तर-मध्य मुंबईतूनही पूनम महाजन यांनीही १ लाख २७ हजार मतांची दणदणीत आघाडी घेऊन प्रिया दत्त यांचा पराभव केला. दक्षिण मुंबईत सर्वात कमी ५२ टक्के मतदान झाले होते. या विभागात मलबार हिल परिसरात झालेले सर्वाधिक मतदान सावंत यांच्या पथ्यावर पडले. त्याचप्रमाणे निष्ठावान शिवसैनिक आणि काही झाले तरी केंद्रात नरेंद्र मोदी आलेच पाहिजेत या हिरिरीने बाहेर पडलेल्या मतदारांनी केलेल्या मतदानाने अरविंद सावंत यांना एक लाखावर मताधिक्य मिळवून दिले.

Leave a comment

0.0/5