Skip to content Skip to footer

विखे पटील आणि शरद पवार यांच्यात विधान सभेला चुरशीची लढत होणार……

शरद पवार जिथे लक्ष घालतात आणि जे ठरवतात ते करूनच दाखवतात हे आता राजकारणातले समीकरण यावेळी मात्र जमू शकलेले नाही. लोकसभेच्या निकालानंतर नगर, मावळ आणि माढा या सह अनेक ठिकाणी हे समोर आले आहे. नगरमधेही पवार-बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता, मात्र, १९९१ ची पुनरावृत्ती काही झालीच नाही आणि विखेंच्या पुढे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात नगर दक्षिण लोकसभेची जागा चर्चेत होती. अगदी सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंत ही जागा चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवारीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्क्याने जिंकूनही दाखवली.

आता निकाला नंतर डॉ. सुजय विखे यांनी युती सह आपल्या समर्थक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी आपल्या विरोधात काम केले त्यांचे येत्या तीन महिन्यात काम तमाम करू असा दमच दिला, तर पवार-थोरात यांच्यावर उपरोधिक टीका करून जशासतसे उत्तर दिले.डॉ. सुजय यांनी तब्बल २ लाख ८१ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने पवार-विखे राजकीय संघर्षात बळीचा बकरा ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी मोदी लाट आणि धनशक्ती ही पराभवाची कारणे सांगत डॉ. सुजय यांना शुभेच्छा दिल्या.डॉ. सुजय विखे यांच्या अभूतपूर्व विजयाने राधाकृष्ण विखे यांचे भाजपमधील वजन वाढले असून त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विखे विरुद्ध पवार आणि थोरात हा संघर्ष पुढील काळात तीव्र होऊन त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार असून जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत होण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a comment

0.0/5