स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत. रेल्वे, विमानतळ, आदींबाबतचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी क्रिडाई कोल्हापूर संघटनेने खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे मंगळवारी केली. कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आम्ही तिघे खासदार लक्ष देणार आहोत. बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी या केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडणार असल्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी यावेळी दिली.
क्रिडाई कोल्हापूरच्या मासिक सभेत ज्येष्ठ सदस्य बाळ पाटणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देऊन खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर प्रमुख उपस्थित होते. खासदार मंडलिक म्हणाले, विमानसेवेच्या माध्यमातून कोल्हापूर हे देशातील विविध शहरांशी जोडणे; रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, खंडपीठ या बाबतींत लवकरच लक्ष घालून त्यांतील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर स्मार्ट सिटी झाली, तर त्यातील अनेक प्रश्न सुटतील.
दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये ‘क्रिडाई नॅशनल’ने परिषद घेतली. देशातील बांधकाम व्यावसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी ही परिषद घेण्यात आली. त्यामध्ये आम्ही कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्याचे मत मांडले. यावेळी त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि डहाणू या शहरांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यासाठी आपण लक्ष घालावे. ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष परीख यांनी रेरा कायदा, जीएसटी, परवडणारी घरे यांबाबतचे अनेक प्रश्न मांडले. कोल्हापूरमधून सध्या तीन खासदारांची शक्ती आहे. बांधकाम व्यावसायिकांची निवेदने त्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविली जातील असे ही बोलून दाखविले.