Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार, ऑडिओ क्लिप व्हायरल

सध्या लॉकडाउन असल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. महाराष्ट्रातही इतर राज्यांमधील अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाही समावेश आहे. यासाठी बिहारमधील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या नम्रतेचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.

दोन मिनिटं २० सेकंदाची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल आहे. आरजेडीचे आमदार सरोज यादव यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या बिहारमधील मजुरांची मदत करण्याची मागणी करत होते. “सर नमस्कार, मी बिहारमधून आरजेडीचा आमदार बोलत आहे. माझ्या शहरातील काही कामगार तुमच्या येथे दोन-तीन ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे अन्नासाठी पैसेही नाहीत,” असं सरोज यादव सांगतात.

यावर उद्धव ठाकरे त्यांनी आपण चिंता करु नका असं सांगत अडकलेल्या कामगारांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहून घेतात जेणेकरुन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. उद्धव ठाकरे मदतीचं आश्वासन देताना सांगतात की, “महाराष्ट्रात आही ८७ हजार लोकांसाठी व्यवस्था केली आहे. तुम्ही काळजी करु नका, आम्ही योग्य ती व्यवस्था करु”. सरोज यादव यावेळी उद्धव ठाकरे यांना आपले कामगार रायगड आणि ठाण्यात अडकले असल्याचं सांगतात.उद्धव ठाकरे यावेळी सरोज यादव यांनी दिलेले फोन क्रमांक लिहून घेतात. सोबतच तुम्ही त्यांची अजिबात चिंता करु नका. योग्य ती मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन देतात.

https://www.facebook.com/388247148018023/videos/265488024641555/

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फक्त आश्वासन दिलं नाही तर तू पूर्णही केली. सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या हरिवंश चौधऱी यांनी शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचं सांगितलं आहे.

सरोज यादव यांनी या चर्चेसंबंधी बोलताना आठ ते नऊ दिवसांपूर्वी आपण त्यांना फोन केला असल्याचं सांगितलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही प्रोटोकॉल मोडून कोणतीही पूर्वसूचना नसताना एका आमदाराशी चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. आज जिथे आमच्या राज्यातील मुख्यमंत्री वारंवार विनंती करुनही बोलण्यास नकार देत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आमच्याशी चर्चा केली,” अशी भावना सरोज यादव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5