मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कॉंग्रेसची नाराजी दूर…!
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर या वादावर पडदा पडला आहे. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती. ती चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून, चर्चेतून आम्ही समाधानी आहोत. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाराज नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
मातोश्रीवर जाऊन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. खासदार संजय राऊत, अनिल देसाई हे देखील यावेळी बैठकीला उपस्थितीत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली. बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
काही विषय असे असता की, त्यांची समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून, आम्ही समाधानी आहोत. मागे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण रश्मीताईंच्या वडिलांच्या निधनामुळे अशा दु:खाच्या प्रसंगी भेट घेणे योग्य नव्हते. पण माध्यमांकडून त्याविषयी चर्चा रंगवली गेली. आम्ही एक कुटुंब असूनल, आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.