भाजपा आणि मनसे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश.
शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि खेड दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी आणि भाजपाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम हे दापोली मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना नेते रामदास कदम यांचे खेड तालुक्याशी एक वेगळे नाते आहे. कदम यांनी अनेक वर्ष आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. दरम्यान या काळात अनेक राजकीय वादळे आली होती. कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वर्चस्वला धक्का लागला नाही.
दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली योगेश कदम यांना शिवसेना दापोली मतदार संघाची उमेदवारी दिली. २०१६ पासून युवा सेनेच्या माध्यमातून दापोली मतदार संघ पिंजून काढलेल्या योगेश कदम यांनी ही निवडणुक अपेक्षेप्रमाणे जिंकली आणि २०१४ च्या निवडणुकीत दापोली मतदार संघावरून उतरलेला शिवसेनेच्या भगवा झेंडा पुन्हा या मतदार संघावर डोलाने फडकू लागला.
१९९० साली खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्यावर रामदास कदम यांनी ज्या प्रमाणे या तालुक्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला होता. विकासकामांच्या माध्यमातून मतदारांची मने जिंकली होती. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आमदार योगेश कदम यांनी देखील या संपुर्ण मतदार संघात विकास कामांचा धडका लावला आहे. मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या निवारण्याचा प्रयत्न करत आहेत.