Skip to content Skip to footer

“माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू”,पंकजा मुंडेचा रोहित पवारांना टोला

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील एकाच मंचावर एकत्र आले आहेत. डॉ. निलेश साबळेंनी त्यांच्या थुकरट वाडीत राजकिय नेत्यांना आमंत्रित केले आहे. लवकरच हा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात याची चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राजकारणात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता. योगायोगाने भाजप नेते सुजय विखे यांची पत्नी धनश्री आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांनी रिंग टाकली आणि नेमकी घड्याळावर पडली आणि एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला यावेळी पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा निशाणा होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. “सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत” असा टोमणा पंकजांनी मारताच “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं आहे. त्यामूळे चला हवा येऊद्याचा हा भाग नक्कीच धुमाकूळ घालणार हे निश्चित आहे.

Leave a comment

0.0/5