ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडातील आणि पृथ्वीपासून १२.७ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या रेडिओ दीर्घिकेचा शोध लावण्यात खगोल शास्त्रज्ञांना यश आले आहे. लिडेन वेधशाळेतील खगोल शास्त्रज्ञ आयुष सक्सेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे स्थित जीएमआरटी रेडिओ दुर्बिणीद्वारे घेतलेल्या माहितीचे विश्लेषण करून हा शोध लावला आहे.
सर्वात दूर असलेल्या या दीर्घिकेचा शोध शास्त्रज्ञांना जूनमध्ये लागला. त्याबाबतची माहिती राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे (एनसीआरए) संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिली. अशा प्रकारच्या रेडिओ दीर्घिकेचा शोध अनेक खगोल शास्त्रज्ञांना अवकाशातील रहस्ये उकलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या शोधासाठी शास्त्रज्ञांना जीएमआरटीसारख्या मोठय़ा रेडिओ दुर्बिणीची गरज भासते. ही दुर्बिण पुण्याजवळील खोडद येथे ३० रेडिओ अँटेना आणि २५ किमी व्यासाच्या परिसरात वाय आकारात उभारण्यात आली आहे. एखादा शास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञांचा समूह अतिदूरवरच्या अवकाशातील खगोल संशोधनासाठी या दुर्बिणीचा वापर करतात.
शास्त्रज्ञांनी लावलेल्या या शोधामुळे ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील वैशिष्टय़े काय होती, या दीर्घिकेचे वेगळेपण काय, त्याचे परिणाम काय, रेडिओ घटकांबाबत रासायनिक प्रक्रिया कशा पद्धतीने होत गेल्या हे समजून घेण्यासाठी बळ मिळणार आहे. टीआयएफआर (टाटा मूलभूत संशोधन संस्था) जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला रेडिओ नकाशा, त्यातील माहितीचे विश्लेषण या शास्त्रज्ञांच्या समूहाने केले. टीआयएफआर जीएमआरटी स्काय सव्र्हेद्वारे गोळा केलेली माहिती जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी उपलब्ध आहे, असे एनसीआरएचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी सांगितले. अशा रेडिओ दीर्घिकेच्या केंद्रस्थानी अतिसंवेदनशील कृष्णविवर, हायड्रोजनचे ढग, वेगवेगळे द्वैती तारे असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या माहिती विश्लेषणातून अनेक शोध या पुढील काळात लागण्याची शक्यता आहे, असेही सोळंकी यांनी स्पष्ट केले.