कॅलिफोर्निया – एक विशेष ऑपरेटींग सिस्टम गुगलने श्रवणदोष असणाऱ्यांसाठी बनवली असून श्रवणयंत्राद्वारेच फोन कॉल घेणे आणि संगीत ऐकणे आता शक्य होणार आहे. थेट तुमच्या अॅन्ड्रॉईड मोबाईल फोनशी हे श्रवणयंत्र जोडता येणार आहे. त्यामुळे, श्रवणदोष असणाऱ्यांना श्रवणयंत्र वापरणे सोयीचे होणार आहे.
‘स्ट्रिमींग फॉर हिअरींग एड्स’ असे या ऑपरेटींग सिस्टमचे नाव असून ब्ल्यूटूथचा यात वापर करण्यात आला आहे. तुमचे श्रवणयंत्र तुमच्या मोबाईल फोनशी या विशेष फिचरद्वारे जोडता येणार आहे. आपण श्रवणयंत्राचा आवाज आपल्या फोनचा उपयोग करून नियंत्रित करू शकतो. तसेच, फोन कॉल घेऊ शकतो आणि फावल्या वेळेत आपले मनपसंद संगीत ऐकू शकतो.
अॅन्ड्रॉईड फोनमध्ये गुगलने हा नवीन प्रयोग केला आहे. श्रवणदोष असणाऱ्यांचा या प्रयोगामध्ये प्रामुख्याने विचार केला आहे. बऱ्याचदा श्रवणयंत्र वापरण्याचा संकोच वाटतो. पण, गुगलच्या या फिचरमुळे हा प्रश्न मिटणार आहे. एखाद्या हेडफोनसारखा याचा वापर करता येत असल्यामुळे, इतरांहून वेगळे पडण्याची भीती अशा लोकांना वाटणार नाही. याची बॅटरी लाईफदेखील उत्तम असल्याने हे फायदेशीर ठरणार आहे.