Skip to content Skip to footer

क्रिकेट एकदिवसीय सामना – भारताचा विजयी चौकार

कोलंबो क्रिकेट – श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने चौथा क्रिकेट एकदिवसीय सामनाही जिंकला.

धावांचे भलेमोठे पाठबळ मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले आणि लंकेचा डाव २०७ धावांत गुंडाळून १६८ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. पदार्पण करणाऱ्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने पहिला बळी मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व सुरू झाले. माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने एकाकी लढत देताना ७० धावांची खेळी केली. भारताकडून विराट कोहलीनेही गोलंदाजी केली. त्याचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांनी विकेट मिळवल्या.

क्रिकेट कसोटी मालिका आणि आता एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाजीसमोर निष्प्रभ ठरलेली श्रीलंकेची गोलंदाजी आज पुरती हतबल झाली. आजच्या सामन्यात लसिथ मलिंगा श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे.

https://maharashtrabulletin.com/brics-china-india-pakistan-terrorism/

त्याने एकदिवसीय क्रिकेट मध्ये ३०० बळी मिळवण्याची कामगिरी केली; परंतु त्यासाठी आज त्याला १० षटकांत ८२ धावांचे मोल द्यावे लागले. जेथे कर्णधारच कमजोर ठरला, मग तेथे त्याच्या सेनेनेही शस्त्रे म्यान केली.

श्रीलंकेत सलग सातव्यांदा नाणेफेक जिंकणाऱ्या विराट कोहलीला फलंदाजीसाठी उपयुक्त अससेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ही खेळपट्टी ३०० धावांची आहे, असे तज्ज्ञांचे मत होते; परंतु बहरात असलेल्या भारतीय फलंदाजांनी त्यात आणखी ७५ धावा वाढवल्या. त्यात त्यांनी ३९ चौकार व सात षटकारांची आतषबाजी केली.

रोहित शर्माने सलग दुसरे शतक केले; तर २९ वे शतक करणारा विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसरा आला आहे. त्याच्यापुढे आता सचिन तेंडुलकर (४९) व रिकी पाँटिंग (३०) आहेत. शिखर धवन बाद झाल्यावर दुसऱ्याच षटकात खेळपट्टीवर आलेल्या कोहलीचे ‘विराट’ रूप श्रीलंकेच्या गोलंदाजांचा थरकाप उडवणारे होते. विश्‍वा फर्नांडोला सलग तीन चौकार मारून, त्याने पुढच्या वादळाची जाणीव करून दिली. ३८ चेंडूंत अर्धशतक केल्यानंतर त्याने एकूण ७६ चेंडूंतच शतकाची मोहोर उमटवली यावरून त्याच्या झंझावाताची कल्पना येते.

दुसऱ्या बाजूला रोहित सुरवातीला शांत होता; पण विराटची टोलेबाजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानेही प्रहार करण्यास सुरवात केली. त्याचाही स्ट्राईक रेट बघता बघता १०० च्या पलीकडे गेला. या दोघांनी अवघ्या २८ षटकांत २१९ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक
भारत – ५० षटकांत ५ बाद ३७५ (रोहित शर्मा १०४- ८८ चेंडू, ११ चौकार, ३ षटकार, विराट कोहली १३१- ९६ चेंडू, १७ चौकार, २ षटकार, मनीष पांडे नाबाद ५०- ४२ चेंडू, ४ चौकार, महेंद्रसिंह धोनी ४९- ४२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार; मलिंगा १०-०-८२-१, मॅथ्यूज ६-२-२४-२). श्रीलंका ः ४२.४ षटकांत २०७ (अँजेलो मॅथ्यूज ७० -८० चेंडू, १० चौकार, मिलिंदा सिरिवर्धना ३९, शार्दुल ठाकूर ७-०-२६-१, बुमराह ७-०-३२-२, कुलदीप यादव ८.४-१-३१-२)

धोनीचा विक्रम
त्रिशतकी सामन्यात धोनीने वन-डेमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम केला. तो ७३ व्या वेळी नाबाद राहिला. यापूर्वीचा उच्चांक दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक व श्रीलंकेचा चमिंडा वाझ यांच्या नावावर संयुक्तरीत्या होता. दोघे प्रत्येकी ७२ वेळा नाबाद राहिले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5