बीजिंग – ब्रिक्स देशांच्या आगामी परिषदेमध्ये दहशतवादाला पाकिस्तानकडून देण्यात असलेल्या उत्तेजनासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात येऊ नये, असे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत.
या परिषदेमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणाचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची भीती चीनला आहे. याआधी गोवा येथे झालेल्या ब्रिक्सपरिषदेमध्येही मोदींनी पाकिस्तानचा उल्लेख “दहशतवादाचे केंद्रस्थान’ असा केला होता.
“पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणासंदर्भात भारतास चिंता आहे, असे आमच्या निदर्शनास आले आहे. मात्र हा मुद्दा ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये चर्चिला जावा, असे आम्हाला वाटत नाही,” असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले. “पाकिस्तान हा चीनचा अत्यंत जवळचा मित्रदेश असल्याने या दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचा उल्लेख केल्यास ब्रिक्सपरिषदेच्या यशावर परिणाम होण्याचा,’ गर्भित इशाराही हुआ यांच्याकडून यावेळी देण्यात आला. चीनमधील शिआनमेन येथे येत्या 3 सप्टेंबरला ब्रिक्स परिषद होत आहे.
https://maharashtrabulletin.com/cabinet-reshuffle-ministeries/
डोकलाम येथील तणावग्रस्त परिस्थिती निवळल्यानंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच चीनला भेट देत आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असतानाच चीनकडून देण्यात आलेला पाकिस्तानसंदर्भातील हा इशाराही अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.