Skip to content Skip to footer

प्रो-कबड्डीतून मुंबई बाद?

मुंबई-  प्रो-कबड्डीतील मुंबईच्या लढतींच्या “पकड’ झाल्यातच जमा आहे. प्रो-कबड्डीचा सहावा मोसम ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल; पण आपल्या घरच्या लढती संयोजनाचा खर्च कमी करण्यासाठी यू मुम्बा मुंबईबाहेर घेण्याचा विचार करीत आहे.

मुंबईतील प्रो-कबड्डीच्या लढती वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील डोममध्ये झालेल्या आहेत; पण या संकुलाची मालकी असलेले नॅशनल स्पोर्टस्‌ क्‍लब ऑफ इंडिया हे लीगसाठी मोठ्या प्रमाणावर भाडे आकारत असल्यामुळे लीगमधील लढती मुंबईबाहेर होण्याची शक्‍यता आहे. या लीगमधील लढतीसाठी दिवसाला 25 लाख भाडे आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे.

एनएससीआयचा डोम क्रीडा लढतीसाठी 50 दिवसांसाठी राखीव ठेवण्याचे बंधन आहे. त्या वेळी दिवसाला एक लाख भाडे आकारण्यात येईल असे ठरले आहे; पण प्रो-कबड्डी सुरू झाल्यापासून कधीही हे सूट असलेले भाडे मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. प्रो-कबड्डी लढतींचा प्रत्येक शहरातील मोसम सात दिवसांचा (सहा दिवस लढती आणि एक दिवस ब्रेक) असतो. त्याचबरोबर लढतीच्या पूर्वतयारीस तीन दिवस लागतात. त्यामुळेच या लढतीच्या संयोजनातील स्टेडियमचे भाडेच अडीच कोटी होते.

प्रो-कबड्डीच्या मुंबईतील सामन्यांच्या तारखांना एनएससीआय उपलब्ध आहे; पण त्याचे भाडे खूपच जास्त आहे. आम्ही अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलाबरोबर चर्चा करीत आहोत; पण प्रो-कबड्डी लढतींसाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही, असे यू मुम्बाची मालकी असलेल्या युनिलायझर स्पोर्टस्‌चे सीईओ सुप्रातिक सेन यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यांनी आम्ही आशा सोडलेली नाही; पण सध्या तरी चांगला पर्याय दिसत नसल्याचे सांगितले.

नाशिकचा पर्याय; पण…
यू मुम्बा व्यवस्थापन नाशिकच्या मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियमचा विचार करीत आहे. त्याची क्षमता एनएससीआयपेक्षा एक हजाराने कमी असेल; पण त्याचे भाडे केवळ 15 हजार आहे. मात्र, नाशिकला लढती घेण्यात संघाच्या प्रवासाचा प्रश्न येऊ शकतो. मुंबईबाहेरील अनेक संघांना भाड्यापोटी खूपच कमी रक्कम मोजावी लागते, या परिस्थितीत मुंबईने हा अतिरिक्त खर्च का सोसावा, असाही दावा होत आहे.

महागड्या ठिकाणांचा लीगना फटका
एनएससीआयमधील खेळांच्या लढती मुंबईबाहेर जाण्याची ही पहिली वेळ नव्हती. प्रीमियर बॅडमिंटन लीग, प्रो-कुस्ती लीग, अल्टिमेट टेबल टेनिस लीगने यापूर्वीच एनएससीआयचे वाढते भाडे लक्षात घेऊन मुंबईतील लीगच्या लढती अन्यत्र नेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी

https://maharashtrabulletin.com/air-india-plane-housefull-for-indian-table-tennis-team/

Leave a comment

0.0/5