Skip to content Skip to footer

नव्याने सुरवात करण्यासाठी पी. व्ही. सिंधू सज्ज

नवी दिल्ली – यंदाच्या नव्या मोसमात तीन स्पर्धेत अंतिम फेरीत जाऊनही विजयापासून दूर राहिलेल्या भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ला आता जागतिक अजिंक्‍यपद आणि आशियाई स्पर्धेतील पदक खुणावत आहे. यासाठी ती नव्याने सुरवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर सिंधूच्या कामगिरीत कमालीचे सातत्य होते. गेल्या वर्षी ती सहा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचली. तीन विजेतीपदे तीने मिळवली; पण जागतिक अजिंक्‍यपद, हॉंगकॉंग ओपन, दुबई सुपर सिरीजसारख्या स्पर्धेत अंतिम सामन्यात ती विजेतेपदापासून दूरच राहिली. या वर्षी सुरवातीलाच ती अंतिम फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयशी ठरली आहे.

सिंधू म्हणाली,””मी अंतिम सामन्यात हरतेयं हे सत्य आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशीच कामगिरीला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. अर्थात, मी याचा विचार करत नाही आणि याचा माझ्या कामगिरीवर परिणामही होत नाही. मी पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हरत असते, तर चिंतेची बाब होती. अंतिम फेरीत काही होऊ शकते. जागतिक आणि आशियाई स्पर्धा पाठोपाठ असल्याने आता नव्याने सुरवात करण्यासाठी मी सज्ज आहे.”

चीनमध्ये नानजिंग येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी (ता. 28) चीनला रवाना होईल. गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंदू आणि जपानची ओकुहारा यांच्यातील लढत 110 मिनिटे चालली होती. सिंधू म्हणाली,””त्या लढतीला एक वर्ष झाले तरी अजूनही त्याच लढतीची चर्चा केली जात आहे. मात्र, मी इतका विचार करत नाही. सुंग जी ह्यून अशीच एक खेळाडू आहे. ही नवोदित असली, तरी सोपी प्रतिस्पर्धी नाही. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत मी तिच्याकडून हरले आहे. म्हणूनच अंतिम फेरीपेक्षा मी प्रत्येक फेरीला तेवढेच महत्त्व देते.”

आशियाई स्पर्धेविषयी 
-आशियाई क्रीडा स्पर्धादेखील आव्हानात्मक
-गुणवत्तेचा दर्जा मात्र अन्य सुपर सिरीज स्पर्धेसारखाच
-कॅरोलिन मरिनखेरीज सर्व आशियाई खेळाडूंचा सहभाग असल्याने आव्हान राहणारच
-राष्ट्रकुलप्रमाणे येथेही भारतीयांमध्ये अंतिम लढत व्हावी अशी अपेक्षा
-मात्र, चीन, जपानी खेळाडूंचे आव्हान राहणारच

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5